पाचोरा, 25 फेब्रुवारी : काही चोरट्यांनी शेतातील वायरची चोरी केल्याची तक्रार पिंपळगाव पोलिसांकडे आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. विशाल सकट, शंकर हतांगळे आणि दशरथ सकट अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेली 100 मीटर कॉपरची वायर जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील पुढील तपासासाठी आरोपींची 3 दिवसांची pcr घेण्यात आली आहे. या आरोपींसोबत आणखी कुणाचा समावेश आहे का, यासंबधित अधिक तपास पोलीस करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी “सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना सांगितले की, 21 फेब्रुवारीला नाईट चेकिंगच्या दरम्यान पोलीस पथकाला शेंदुर्णी येथील दोन संशयित आढळले होते. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कटर आणि टॉमी मिळाली. रात्रीच्या वेळी टॉमी घेऊन फिरत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर घरफोडीचा संशय आला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी मोटर आणि धरणातील केबल चोरायला आलो असल्याची कबुली दिली.
दरम्यान, एप्रिल 2022 मध्ये केबल चोरीची एक तक्रार दाखल करण्यात आली होती. ही चोरी याच आरोपींनी केल्याची कबुलीही यावेळी आरोपींनी दिली. तसेच इतर ठिकाणीही केबल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
दरम्यान, या दोन्ही आरोपींनी आणखी एका आरोपीचे नाव सांगितल्यावर त्यालाही शेंदुर्णी येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 100 मीटर कॉपरची वायर जप्त करण्यात आली आहे. भविष्यात आणखी याप्रकरणाची मोठी उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांनी केली.