चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नंदुरबार, 10 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदुरबारमध्ये जाहीरसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सभेत बोलताना शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांना ऑफर दिली.
शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, असे वक्तव्य केले असताना त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार आणि चार दिवसांनी काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा अभिमानाने छाती फुगवून आमच्यासोबत या. अजितदादा-शिंदेंसोबत या. यामुळे तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी काँग्रेससारखे शाही घराण्यातून नाही निघालो. पाण्यासाठी इथल्या लोकांचे हालअपेष्टा मी जाणून होतो. स्वातंत्र्यानंतर अनेक गावात वीज नव्हती. आणि म्हणून प्रत्येक आदिवासी बांधवाला घर पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज नंदुरबारात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित, मंत्री अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच महायुतीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नंदुरबार येथील आदिवासी बांधव-भगिनी उपस्थित होते.
शरद पवार काय म्हणाले होते? –
शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वीच केलेल्या वक्तव्यानुसार ते म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये कोणताही फरक असल्याचे मला वाटत नाही. आम्ही गांधी, नेहरू या विचारसरणीचे आहोत. माझ्या सहयोगींसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीच्या जवळ असून भविष्याचा विचार एकत्र येऊन केला जाईल. मात्र, मोदींसोबत जुळवून घेणे कठीण असल्याचेही ते म्हणाले होते.