चंद्रकांत दुसाने/मिलिंद वाणी, विशेष प्रतिनिधी
जळगाव : केंद्र सरकार महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी प्रत्येक प्रकारे राज्य सरकारांच्या सोबत आहे. आम्हाला भारताच्या समाजातून ही पापी मानसिकता नष्ट करूनच थांबावे लागेल. वरपासून खाली, संदेश अगदी स्पष्टपणे जायला हवा, हे पाप अक्षम्य आहे. सरकारे येतील आणि जातील, मात्र, जीवनाचे रक्षण, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण, या समाजाच्या आणि सरकारच्या दृष्टीने आपल्या सर्वांचे मोठे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगावात केले.
गेल्या काही दिवसात देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. कोलकातामध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर बदलापुरातही 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रातही एक संतापाची तसेच भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील, देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर का बोलत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर आता आज जळगावातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले.
महिला अत्याचारांच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
जळगावात आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला अत्याचाराच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरही भाष्य केले. या कार्यक्रमात ते म्हणाले की, आज मोठ्या संख्येने मुली व्यवसाय व्यवस्थापन करत आहेत. राजकारणातही मुलींची संख्या वाढावी यासाठी आम्ही नारी शक्ती वंदन कायदा बनवला. माता, बहिणी, मुलींचे सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यांची सुरक्षाही देशाची प्राथमिकता आहे. मी लाल किल्ल्यावरुनही या विषयावर भाष्य केलंय. आज देशातील कोणतेही राज्य असो, आपल्या बहिणी आणि मुलींच्या यातनेला, त्यांचा राग मी समजू शकतो. मी पुन्हा एकदा देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक राज्य सरकारला सांगेन, महिलांच्या विरोधात गुन्हा हे अक्षम्य पाप आहे. दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही रुपाने मदत करणारेही वाचता कामा नयेत. रुग्णालय असो, शाळा असो, ऑफिस असो किंवा पोलीस व्यवस्था, ज्याठिकाणी निष्काळजीपणा होईल, त्या सर्वांचा हिशेब व्हायला हवा, या शब्दात त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, वरपासून खाली, संदेश अगदी स्पष्टपणे जायला हवा, हे पाप अक्षम्य आहे. सरकारे येतील आणि जातील, मात्र, जीवनाची रक्षण, महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण, या समाजाच्या आणि सरकारच्या दृष्टीने आपल्या सर्वांचे मोठे कर्तव्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यायला, आमचे सरकार कायदेही कठोर करत आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने देशातील बहिणी आणि मुली याठिकाणी आहेत. त्यामुळे मी सांगू इच्छितो की, वेळेवर सुनावणी होत नाही, एफआयआर होत नाही, अशी आधी तक्रार यायची. मात्र, अशा अनेक अडचणींना आम्ही भारतीय न्याय संहितेत दूर केले. यामध्ये संपूर्ण चॅप्टर महिला आणि चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तयार करण्यात आले आहे.
लैंगिक गुन्हा करणाऱ्यांवर… –
जर पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचे नसेल तर त्या घरबसल्या ई एफआयआर करू शकते. ई एफआयआर आल्यावर कुणीही पोलीस ठाण्यात निष्काळजीपणा करू शकणार नाही. यामुळे वेगाने तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी यामुळे मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन कायद्यात अल्पवयीनांवर झालेल्या लैंगिक गुन्हा केल्यावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्यांवर…
मुलींसोबत लग्नाच्या नावावर फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. आधी याबाबत स्पष्ट कायदा नव्हता. मात्र, आता भारतीय न्याय संहितेत लग्नाचे खोटे आमिष आणि छळ दोघांना परिभाषित केले आहे. केंद्र सरकार महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी प्रत्येक प्रकारे राज्य सरकारांच्या सोबत आहे. आम्हाला भारताच्या समाजातून ही पापी मानसिकता नष्ट करूनच थांबावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अनेक केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
नार पार गिरणा प्रकल्प : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?