सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 9 मार्च : पारोळा शहरात भरवस्तीत गॅस भरताना कार जळून खाक झाल्याच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन अॅक्शन मोर्डवर आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी सव्वा लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
पाच वाहनांवर कारवाई –
पारोळा येथे भरवस्तीत गॅस भरताना कार जळून खाक झाल्यानंतर पारोळा पोलिसांनी अवैध वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई करत सव्वा लाख रूपयांचा दंड आकारला आहे.
वाहने पोलिसांनी केली जप्त –
पारोळा बस स्थानक परिसरात गुरूवार 8 मार्च रोजी दुपारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगळे, पोलीस शिपाई दीपक अहिरे, भूषण पाटील यांनी नियम मोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. ही सगळी वाहने पारोळा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहेत.
गॅस भरताना कार जळून खाक –
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेलार नगरमध्ये ओमनी कारमध्ये गॅस भरत असताना त्या कारने अचानक पेट घेतल्याने दोन गाड्या जळून खाक झाल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनेची दखल घेत तत्काळ पारोळ्याचे प्रातांधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर पोलिस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतून करणाऱ्या वाहनांना लक्ष केले आहे.
हेही वाचा : ओमनीने अचानक पेट घेतल्याने दोन गाड्या जळून खाक, पारोळा शहरातील घटना