चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लोहारा (पाचोरा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे भेट दिली. लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या पुतणी आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथील उद्योगपती प्रदीप चौधरी यांची मुलगी यांच्या मुलीचा कन्नड येथे 7 फेब्रुवारीला सायंकाळी विवाह होता. या विवाह सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्यासह काही व्हीआयपी मान्यवर उपस्थित होते. याच विवाह सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यासुद्धा उपस्थित होत्या.

विवाह सोहळ्यानंतर परतत असताना जसोदाबेन मोदी यांनी शिर्डी आणि महाराष्ट्रातील काही देवस्थानांचे दर्शन घेतले. त्यानंतर 8 तारखेला रात्री त्यांनी कौटुंबिक संबंध असलेल्या लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या ‘दादाश्री विश्व’ याठिकाणी लोहारा येथे भेट दिली. तसेच 8 तारखेला त्यांनी लोहारा याचठिकाणी मुक्काम केला.
या भेटीदरम्यान, जसोदाबेन मोदी यांनी लोहारा येथील डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत कौटुंबिक संवाद साधला. यानंतर 9 फेब्रुवारीला सकाळी जसोदाबेन मोदी या नाशिकमार्गे गुजरातला रवाना झाल्या.
मोदी कुटुंबीयांची याआधीही उपस्थिती –
दरम्यान, जसोदाबेन मोदी यांनी याआधीही याठिकाणी भेट दिली होती. तसेच डॉ. प्रीतराज चौधरी यांच्या लग्नाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी आणि मोदी परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते.
जसोदाबेन मोदी यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन –
दरम्यान, आपल्या या दौऱ्यादरम्यान, जसोदाबेन मोदी यांच्या हस्ते हुंदका या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तांडव प्रतिष्ठानतर्फे अॅड. बबिता गाडेकर यांच्या महिला आणि बालमजुरी या सामाजिक प्रश्नांवर आधारित ‘हुंदका’ या कविता संग्रहांचे प्रकाशन 8 फेब्रवारी ऑरिक हॉल, शेंदवा एमआयडी, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी करण्यात आले. याबाबत तांडव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र घडामोडे, उपाध्यक्ष मयुर हटकर आणि सचिव डॉ. जयकुमार यांनी जसोदाबेन मोदी यांचे आभार मानले.