जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 25 ऑगस्टला ‘लखपती दीदी संमेलनाला’ येणार आहेत. हा जळगावकरांसाठी सुवर्ण योग आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. अत्यंत भव्य अशा प्राईम इंडस्ट्रीयल पार्कच्या मैदानावर हा कार्यक्रम होतो आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, हे लक्षात घेवून त्या दृष्टीने कार्यक्रमाची तयारी केली असून त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम हा जळगावकरांसाठी सुवर्ण योग आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एक लाखापेक्षा अधिक भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घेण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
जळगाव विमानतळाच्या समोरील ‘ प्राईम इंडस्ट्रीयल पार्क’ येथे होणाऱ्या कार्यक्रमाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. यावेळी राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोण कोण असेल दौऱ्यात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीहून सरळ जळगावला येणार आहेत. यानंतर या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते नवी दिल्लीकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रशासन आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत.
कसे असेल नियोजन –
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुरुवातीला जळगाव विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते मेळावास्थळी पोहोचतील. साधारणत: दीड तासांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते काही वेळ स्थानिक मंत्री, पदाधिकाऱ्यांना देतील. यानंतर विमानतळाकडे प्रयाण करतील.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा, रविवारी अजिंठा चौफुली ते नेरी मार्ग बंद, वाहतुकीत असा बदल