सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 8 जुलै : पारोळा तालुक्यातून कंत्राटी वायरमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे विभागात महावितरण कंपनीसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वायरमनचा विजेचा शॉक लागून जागीच अपघाती मृत्यू झाला. दिनेश शामकांत भामरे (32) असे मृत वायरमनचे नाव आहे. दरम्यान, या वायरमनच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने ठिय्या आंदोलन केले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील म्हसवे ते नगाव रस्त्यावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी शनिवारी दिनेश भामरे हा पोलवर चढला असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला. यामध्ये दिनेशला प्रचंड विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच पोलवर चिकटला. दरम्यान, त्याचे काका सुनील बाबूलाल भामरे (51) यांनी म्हसवे परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने खाली उतरून वैद्यकीय उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
वायरमनच्या मृत्यूनंतर ठिय्या आंदोलन –
शॉक लागून मृत्यू झालेला दिनेश भामरे हा कंत्राटी वायरमन म्हणून असल्याने महावितरण कंपनी त्यास मोबदला देण्यास असमर्थ आहे, असे दिनेशचे नातेवाईक आणि मित्रमंडळीना निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी अमळनेर रस्त्यावरील 33 केव्ही महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी सकाळी दहावाजेपासून साडेअकरा वाजेपर्यंत रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, महावितरण अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळावरू असलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हता.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदतीचे आश्वासन –
दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन उपस्थितांसोबत संवाद साधला. तसेच संपूर्ण जमावाला शांत केले. दरम्यान, आपण दिनेशच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा : Rain Update : राज्यभरात मुसळधार पाऊस, ‘असा’ राहील जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज