चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 25 मे : सध्या राज्यभरात पुणे पोर्श कार अपघात प्रकरण जोरदार चर्चेत आहे. या अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. पुणे अपघात प्रकरणातील विधीसंघर्षित मुलगा वेदांत अग्रवालच्या वडिलांना अटक केल्यानंतर त्याच्या आजोबांनाही पोलिसांनी अटक केली. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये –
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिसांनी अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना आज सकाळी अटक केली. तसेच या अपघात प्रकरणात विशाल अगरवाल हा देखील पोलीस कोठडीत असून अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे. दरम्यान, सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबा असे एकाच कुटुंबातील तिघांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.
वडिलांनंतर आजोबांनाही पोलिसांनी केली अटक –
पुणे गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलावले होते. यावेळी त्यांनी त्यांची कसून चौकशी केली होती. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. यानंतर ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने त्यांच्यावर पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करत त्यांना आज अटक केली आहे.
पुणे कार अपघात प्रकरण –
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन आरोपीने दारुच्या नशेत प्रचंड वेगात पोर्शे कार चालवल्याने अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अवघ्या 15 तासात त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने त्याला 300 शब्दात निबंध लिहायला देखील सांगितले होते. यानंतर राज्यात यावरून प्रतिक्रिया उमटल्या असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची तत्काळ दखल देत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावरून पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
हेही वाचा : वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप, पांढरद येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार