जळगाव, 20 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, आता काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असताना पुन्हा एकदा पाऊस पुन्हा परतणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यात 24 सप्टेंबरपासून दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात पाऊस पुन्हा परतणार! –
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात म्यानमारजवळ 22 सप्टेंबर रोजी तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात 24 सप्टेंबरपासून दमदार पाऊस होणार आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
जळगावचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड पाहायला मिळतोय. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 20 ते 23 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच 24 ते 29 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होऊन, आगामी काही दिवस किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल.
शेतपीकांना फटका बसण्याची शक्यता –
बंगालच्या उपसागरात म्यानमारजवळ तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यास त्याचा फटका खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. आधीच जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीची वाढ खुंटली तर उडीद व मुग या पीकांचे नुकसान झाले. दरम्यान, . सप्टेंबरअखेरीस कापूस वेचणीला सुरुवात होणार असून सोयाबीन काढणीही सुरू होईल. यावेळी जर पाऊस झाला तर कपाशी व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.