नाशिक, 4 फेब्रुवारी : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ‘झुमका वाली पोर’ या गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद उर्फ सचिन कुमावत याच्याविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. विनोद उर्फ सचिन कुमावतवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध युट्यूबर ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतविरोधात नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (2 फेब्रुवारी) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘विनोद कुमावत’ या यू ट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणाऱ्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान पीडितेसोबत ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून 30 ऑगस्ट ते 2022 ते 17 जानेवारी 2023 या पाच महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले.
तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू –
विनोद उर्फ सचिन कुमावत हा सातपूरमधील म्हाडा कॉलनीत राहतो. पीडितासोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून अजून विनोदवर कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. दरम्यान, नाशिकरोड पोलिसांतर्फे या घटनेचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. ‘झुमका वाली पोरं’ हे गाणे सोशल मीडियात ट्रेडिंगला असून आतापर्यंत या गाण्याने यू ट्युबवर 225M व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा : आमदार गणपत गायकवाड यांना गोळाबार प्रकरणात पोलिस कोठडी; गृहमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश