जळगाव, 4 जुलै: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत असून 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट भागातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट –
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि विदर्भातील वाशिम, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असून काही तालुक्यांमध्ये रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर ठिकठिकाणी वेगवेगळा असून काही भागांत रिमझिम, तर काही भागांत मुसळधार होताना दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात ४, ५ आणि ६ जुलै रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पावसाच्या किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या एक-दोन सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






