मुंबई, 4 मे: देशाच्या राजकीय समीकरणांना दिशा देणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासांत स्पष्ट होणार आहेत. प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्ताबदलाच्या शक्यतेवर रंगलेल्या या निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, या निकालांवर ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि हिमंता बिस्वा सरमा यांसारख्या दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. प्रतिष्ठेच्या लढतीत बदललेल्या बंगालमध्ये यंदा विक्रमी ९२ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याने, ममता दीदींचा सलग चौथा विजय होणार की भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती, तसेच भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी येथे पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. एक्झिट पोलनुसार त्या दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत अजित पवार यांच्या नावावर असून, त्यांनी 2019 मध्ये गोपीचंद पडळकर यांचा 1 लाख 65 हजार 265 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे हा विक्रम मोडण्यासाठी 1 लाख 65 हजार 266 हा आकडा महत्त्वाचा ठरणार आहे.
दुसरीकडे, राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी नेमका काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम






