इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 जुलै : जळगाव जिल्ह्यातील वडली या गावी चोरीची घटना ताजी असतानाच आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. पाचोरा तालुक्यातील शहापुरा या गावात जबरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
46 ग्रॅम सोनं चोरीला –
पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन हद्दीतील शहापूरा या गावी गणेश रुपचंद परदेशी यांच्या घरी ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने कडी खोलून त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी पेटीतील 46 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ भार वजनाचे चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. ही घटना 18 जुलै रोजी घडली, अशी माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी धनंजय येरुळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए. वाघमारे यांनी भेट घटनास्थळी भेट दिली. तसेच याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय अमोल पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चोरीच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.