जळगाव, 19 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या? –
जळगाव दौऱ्यावर असताना मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रुपाली चाकणकर म्हणाल्या की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत. असे म्हणत आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नसल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, स्वतःचे कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी आमच्यावर बोलू नये, असा टोलाही चाकणकर यांना खडसे यांना लगावला.
रोहिणी खडसे यांचे प्रत्युत्तर –
रुपाली चाकणकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही. अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्व देत नाही, असे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांच्या टीकेला दिले आहे. तसेच रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीकाही याआधी रोहिणी खडसे यांनी केली होती.