मुंबई, 22 मार्च : राज्यात अलीकडच्या काळात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सत्ताधारी-विरोधक पक्षांमधील राजकीय नेत्यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण येत असतात. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्र अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात भेट झाल्याने पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतो का अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजितदादा-जयंत पाटील यांच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाराज व्यक्त करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून सुद्धा अनेक जण सोडून गेले. आम्ही त्यांच्या वाऱ्याशी देखील जात नाही. ज्यापद्धतीने त्यांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले. यामुळे आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जात नाही. मात्र, यांचं बरं असतं. यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यट, विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था अशा प्रकारच्या संस्था असतात. दरम्यान, आमच्याकडे अशी एकही संस्था नसते. त्यामुळे आमच्या कोणाशी भेटी-गाठी होत नाही आणि जर भेटीची वेळ आलीच तर आम्ही भेटत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केलीय.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया –
अजितदादा-जयंत पाटील यांच्या भेटीवर संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. सशक्त लोकशाहीत अशा भेटी काही गैर नाही. कोणत्याही मतदारसंघातील कामानिमित्त अधिवेशन सुरू असताना मी देखील केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांची घेत असते. दरम्यान, आरोप-प्रत्यारोप ज्यावेळी झाले. त्यावेळी आमची टीम ताकदीने शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहिली. मैत्री आणि साथ असल्याने जे खरं आहे, त्याबरोबर आम्ही उभे राहणार, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात भेट? –
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीबाबत देखील माध्यमांसमोर स्पष्ठीकरण दिलंय. अर्थसंकल्पात एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा : Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संवेदनशीलता; मुक्या जीवांसाठी तत्परता, नेमकी बातमी काय?