छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी संजय राऊतांनी वेगळा गट स्थापन करण्याचे अनेक आमदारांना सांगितले होते. तब्येतीचे कारण सांगून अथवा काही ना कारण दाखवून त्यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवणे हा त्यामागचा उद्देश होता. एवढेच नव्हे तर लंडनमध्ये उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन होणार होते. मात्र, ते ऑपरेशन थांबविण्यात आले होते. यामागे मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊतांची स्वतःच इच्छा होती, असा खळबळजनक दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय.
मंत्री संजय शिरसाट यांचा दावा –
राज्यसभा खासदार तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत आरोप केले होते. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत संवाद साधत राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट म्हणाले की,महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांचं कामकाज पाहून संजय राऊत यांनी एक वेगळा गट स्थापन करण्याचे अनेक आमदारांना सांगितले.
View this post on Instagram
मंत्री शिरसाट यांचे राऊतांना आव्हान –
उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा गट कामाला येईल, त्यामध्ये राऊतांचा वैयक्तिक फायदा होता, हे आता लपून राहिले नाही. संजय राऊत हे पाठीमागे उद्धव ठाकरेंना एकेरी उल्लेख करायचे असाही आरोप मंत्री शिरसाट यांनी केलाय. दरम्यान, कशामुळे सत्ताबदल तसेच का उठाव झालाय, या सगळ्या गोष्टींचे खुलासे करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमच्यावरचे आरोप सिद्ध करायचे असतील तर समोरासमोर बसा असे आव्हानच मंत्री शिरसाट यांनी राऊतांना दिले आहे. यासोबत शिवसेनेतील फुटीला संजय राऊत जबाबदार असल्याचेही मंत्री शिरसाट म्हणाले आहेत.