जळगाव, 18 मे : लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवषी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदार संसदरत्न ठरले आहेत. दरवर्षी, संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर –
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत, भाजपच्या स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या 7 खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे. येत्या जुलै महिन्यात 15 व्या संसदरत्न पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील सात खासदारांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देण्यात येणार आहे. यामध्ये र्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे चार खासदार 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरले आहेत.
स्मिता वाघ यांची पहिल्याच टर्ममध्ये भरारी –
स्मिता वाघ ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महिला खासदार म्हणून प्रतिनिधित्व करताएत. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांचा दारूण पराभव करत एकहाती विजय मिळवला होता. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात पहिल्या महिला खासदार म्हणून निवडणून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. दरम्यान, स्मिता वाघ यांनी पहिल्याच टर्ममध्ये वर्षभरात केलेल्या कामिगिरीची दखल घेत त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
2010 पासून दिला जातोय पुरस्कार –
भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आणि 2010 ला या पुरस्काराचे अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती तसेच एकूण कामगिरीबद्दल खासदारांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.