धुळे – धुळे येथील कारागृहात बंदी असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदुरबार येथील एका शिक्षकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून या तरुणीने 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी या तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. तसेच तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या बंदीवान तरुणीने कारागृहातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
नेमकं काय घडलं –
चंद्रमा बैरागी असे या 20 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. काल मंगळवारी ही घटना समोर आली. न्यायालयीन कोठडीत असलेली ही तरुणी काल 21 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जेवणाच्या वेळी बरेकसमोर हजर न राहिल्याने तिचा शोध घेण्यात आला. यावेळी तिचा शोध घेतला असता ही तरुणी महिला कर्मचारी कार्यालयाच्या मागे ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच तुरुंगाधिकारी व अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारागृह वैद्यकीय अधिकारी एस. एस. पाटील यांनी तपासणी करुन या तरुणीला मृत घोषित केले.
कारागृह अधीक्षकांनी दिली ही माहिती –
माध्यमांशी बोलताना धुळे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सकाळी 11.15 ते 11.30 वाजेच्या सुमारास कारागृहातील न्यायालयीन बंदी चंद्रमा संजय बैरागी ही महिला देवपूर पोलीस ठाणेमार्फत दोन दिवसांपूर्वी कारागृहात दाखल झाली होती. यानंतर तिने आज (मंगळवारी) महिला विभागातील हॉलच्या मागे बाथरुमला जात असल्याचे सांगून तिने त्याठिकाणी आत्महत्या केली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून न्यायाधीशांसमोर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाणे धुळे शहर यांच्यावतीने केला जात आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश –
दरम्यान, या तरुणीची आत्महत्येची घटना समोर येताच तिच्या कुटुबीयांनी एकच आक्रोश केला. तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या प्रकरणी करण्यात आली होती अटक –
धुळ्यातील या तरुणीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. यानंतर या शिक्षकाशी मैत्री केली. तसेच 11 जानेवारी रोजी शिक्षकाला आपल्या घरी बोलावले. त्यानुसार 12 रोजी नंदुरबार येथील शिक्षक धुळे येथे मुलीच्या घरी आला. यानंतर थोड्या वेळातच 3 संशयित मुलीच्या घरात शिरले आणि त्यांनी शिक्षकाचे मुलीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यानंतर तिघांनी शिक्षकाला शिवीगाळ केली तसेच 12 लाखांची खंडणीची मागणी केली, असा आरोप तिच्यावर होता.