पाचोरा, 13 एप्रिल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव याठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या. यानंतर आता पाचोरा येथे येत्या 23 एप्रिलला त्यांची विराट सभा होणार आहे. पक्षबांधणीसाठी या सभा होत असल्याची माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली.
गेल्या वर्षी राज्यात शिवसेनेत फूट पडली आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाता शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या चुलत बहीण आणि माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या या राजकारण सक्रीय झाल्या आणि त्यांनी ठाकरे गटाला समर्थन दर्शवले. त्यामुळे पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंची पाचोरा येथे सभा होणार आहे. दरम्यान, यावेळी ते पाचोऱ्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पाचोरा येथे संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे.
असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा –
- 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ते विमानाने जळगावकडे निघतील.
- दुपारी 12.30 वाजता ते जळगावहून पाचोरा येथे जातील.
- त्याठिकाणी भोजनासह नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे.
- दुपारी 4.30 ते माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील
- त्यानंतर ते काही वेळ निर्मल सीडस्वर थांबतील.
- यानंतर सायंकाळी 6 वाजता ते शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जाणार आहेत.
- पाचोरा शहरातील अटल मैदानावर त्यांची विराट सभा होईल.
- त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.