मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत. लखपती दीदी हे निमित्त आहे. या देशात लाखो तरुण बेरोजगार, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. ते युक्रेन, पोलंड, रशिया येथेही भाजपच्या प्रचाराला गेले होते आता जळगावालाही त्याच कार्यक्रमासाठी आले आहेत. लखपती दीदी हे निमित्त आहे. या देशात लाखो तरुण बेरोजगार, त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे, या शब्दात त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
महिलांना सुरक्षा द्या –
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात महिला सुरक्षेसाठी आंदोलन केले जात आहे. त्याबाबत पंतप्रधान काहीच नाहीच बोलले. ज्या जळगावला पंतप्रधान येत आहेत, तिथे 15 दिवसात 4 महिलांवर अत्याचार झाले. 1 मुलगी आहे. 1 दिव्यांग आहे. कुणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगायला हवं, तुम्ही कुणाला लखपती बनवत आहात. आधी आपल्या दीदींना सुरक्षा द्या. त्याबाबत कुणीच बोलत नाही. पंतप्रधान येतील, आणि दुसऱ्या जागी जातील. फक्त फिरत राहतील आणि आमच्या दीदी या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात न्यायासाठी फिरत राहतील. मग पोलीस ठाणे त्यांची एफआयआर घेणार नाही. मग जनता आंदोलन करेन. मग कुणी न्यायालयात जाईल आणि आंदोलनावर बंदी आणेल, अशा शब्दात त्यांनी जोरदार निशाणा साधला.
मोदींचा जळगाव दौरा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 25 ऑगस्ट रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन 11 लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत. पंतप्रधान 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ 4.3 लाख बचत गटातील सुमारे 48 लाख सदस्यांना होईल, असे सांगण्यात आले आहे.