नवी दिल्ली – जे महाराष्ट्र लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही, असे म्हणत शिवसेना उबाठा गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांची भूमिका अधिकृत असल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दिल्लीत महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राऊतांची भूमिकेला दुजोरा दिला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे –
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी नागपूर अधिवेशना दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. माध्यमांच्या या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहोत तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहोत, हे आम्ही जाहीर केले आहे, जी कामे आहेत, ती तिथे नेलेली आहेत आणि आपल्यासमोर तिच आणलेली आहेत. पण महाराष्ट्र लुटण्यासाठी कधी त्यांचं कौतुक केलं नाही. महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलेलं नाही. जे महाराष्ट्र लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कुणी कुणाचं कौतुक करावं, हा त्यांचा विषय असतो. पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली, फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर, आणि आम्हाला राग या गोष्टीसाठी आहे की, अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात. यांनी वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं चिन्ह हे चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केलं. महाराष्ट्रात जी सुख, शांती, समृद्धी आणण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, मग ते वेगवेगळ्या उद्योगांचे करार असतील, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पापही एकनाथ शिंदे यांनी केलं आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
राहुल गांधींची भेट घेतली –
काल रात्री राहुल गांधी यांची भेट घेतली. आज अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे. आज देशात प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा होत आहे. निष्पक्षपणे निवडणूक होत आहेत का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पक्षाने पुढे येण्याची गरज आहे. जे आमच्यासोबत झाले, जे काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यासोबत झाले ते उद्या बिहारमध्ये नितीश कुमार, आरजेडीसोबत होऊ शकते आणि तिथेही भाजप सत्तेत येऊ शकतो. तसेच चंद्राबाबू यांच्यासोबतही तसेच होऊ शकते. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला संपवणे हे भाजपचे स्वप्न आहे, असा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
हेही वाचा – ‘…हा महादजी शिंदे यांचा अपमान’, संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रत्युत्तर, म्हणाले…