धुळे : खान्देशातील धुळे जिल्ह्याच्ये भूमिपूत्र असलेल्या जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. राम सुतार यांनी गुजरातमधील केवडिया कॉलनीतील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा तयार केल्याने त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. राम सुतार यांनी आजतागायत शेकडो शिल्प तयार केली आहेत. यामध्ये जगातील जवळपास 80 देशात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या शिल्पासह 350 पुतळे यांचा समावेश आहे. सध्या ते दिल्लीलगत असलेल्या नोएडा भागात वास्तव्यास आहेत. धुळे ते दिल्ली पर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यामुळे नेमकं कोण आहेत राम सुतार, त्यांच्या कारकिर्दीविषयी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे घेतलेल्या त्यांच्या कार्याचा हा विशेष आढावा.
वयाच्या 22व्या वर्षी आयुष्यात पहिले शिल्प तयार –
धुळे शहरापासून 2 ते 3 मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावी वंजी सुतार यांच्या कुटुंबात 19 फेब्रुवारी 1925 रोजी राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वंजी हंसराज सुतार हे व्यवसायाने सुतार होते. त्यामुळे कलेचा संस्कार त्यांना घरातूनच मिळाला. शेतीसाठी लागणारी अवजारे, बैलगाडी आदी वस्तू त्यांचे वडील खूपच आखिव रेखीव पद्धतीने तयार करीत असत. त्यातूनच त्यांना चित्र रेखाटण्याची व शिल्प साकारण्याची आवड निर्माण झाली. शालेय जीवनात शिक्षकांनी माझ्यातील कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्यातील कलाकाराची पायाभरणी झाली. गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने पुढे पाचवी शिकायला म्हणून निमजाळे या गावातील शाळेत प्रवेश घेतला. सहा फूट उंचीच्या पहीलवानाचा सिमेंटचा पुतळा साकारून 1947 मधे सुतार यांनी आयुष्यात पहिले शिल्प तयार केले.
शिल्पातून मिळालेली पहिली कमाई –
पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत ते जाऊन इथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परिक्षाही उत्तीर्ण केल्या. त्यांच्या उत्तम कामामुळे इथेच त्यांना चित्रकलेतून पैसेही मिळायचे. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना मॉडेल व चित्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना प्रती वस्तू 5 रूपये मिळकत मिळायची. दरम्यान, 1948 साली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे सिमेंटचे शिल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी महात्मा गांधीचे चार फुटांचे सिमेंटचे शिल्प तयार केले. या मोबदल्यात त्यांना 100 रूपये मिळाले. ही शिल्पातून मिळालेली त्यांची पहिली कमाई होती.
रामकृष्ण जोशी यांच्या मदतीने राम सुतार मुंबईला गेले व माटुंग्यात राहू लागले. 1949 मध्ये त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे प्रवेश घेतला. शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला व त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केले. इथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवत मेयो पदक पटकाविले. यानंतर त्यांनी जे.जे. म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केले.
याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाने वेरूळ व अंजिठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टीस्टची परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण करून सुतार यांनी 1954 ते 1958 या कालावधीत या लेण्यांतील मुर्त्यांच्या डागडूजीचे काम यशस्वीपणे केले. 1959 मध्ये त्यांनी दिल्लीस्थित केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत जाहीरात व दृष्य प्रचार संचालनालयाची (डीएव्हीपी) नोकरी स्वीकारली आणि तेव्हापासूनच ते दिल्लीत स्थायिक झाले.
आयुष्याला कलाटणी अन् नोकरीचा राजीनामा –
दिल्लीतील प्रगती मैदानावरील कृषी प्रदर्शनात सुतार यांनी उभारलेला शेतकऱ्याचा पुतळा अधिकाऱ्यांना फारच आवडला व त्यांनी लगेच सुतारांची भेट घेऊन त्यांना दोन शेतकरी जोडप्याचे दोन पुतळे बनविण्याची ऑर्डर दिली. त्यांनी शेतकरी महिला व पुरूष असे प्रत्येकी 13 फुटाचे दोन पुतळे तयार केले त्याचा मोबदला म्हणून सुतार यांना 15 हजार रुपये मिळाले. हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सरकारी नोकरीत राहून तूम्ही हे काम करू शकत नाही असे त्यांच्या डीएव्हीपीतील अधिकाऱ्याने सांगितले. सुतार यांनाही आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखविण्यासाठी स्वतंत्र काम करण्याची निकड भासू लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
संसदेच्या आवारात उभारण्यात आलेले महापुरूषांचे 16 पुतळे आणि महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदेशात महात्मा गांधीचे पुतळे उभरण्याचे काम करीत जवळपास 80 देशांमधे गांधीसह इतर 350 पुतळे उभारण्याची किमया खान्देशचे सुपूत्र असलेल्या राम सुतार यांनी साध्य केली आहे.
गुजरातमध्ये बसविण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचेही ते आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी काम केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत सांगायचे झाले तर त्या पुतळ्याची प्रत्यक्ष उंची 522 फूट आहे. सरदारांच्या पुतळ्याची उंची नदीपात्रापासून 607 फूट (182 मीटर) आहे. एकात्मतेचे स्मारक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून नामाभिधान केलेला सरदारांचा पुतळा सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभा केला आहे.
2016 मध्ये 1 कोटींचा पुरस्कार जाहीर –
अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे राम सुतार यांच्या कल्पनेतूनच साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा 2016 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे.
संसदेच्या आवारात उभारले 16 पुतळे –
राम सुतार यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचे 16 पुतळे सुतार साकारले आहेत. 16 ते 18 फुटांच्या धातूनिर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे.
राम सुतावर यांच्यावर महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे. ते जेमतेम दुसरीत असतानाच गांधीजींनी त्यांच्या गावाला भेट दिली होती. सुतार यांच्या कलात्मक हातातून गुजरातमधील गांधीनगर येथे सचिवालयात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या अलौकीक शिल्पासाठीच त्यांना पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वडिलांचा वारसा सांभाळत आहेत एकुलते एक चिरंजीव –
सुतार यांच्या कलेचा वारसा त्यांचे एकुलते एक चिरंजीव अनिल सुतार सांभाळत आहेत. अनिल सुतार यांना लहानपणापासूनच वडिलांच्या शिल्पकलेने प्रचंड वेड लावले. मुलाची शिल्पकलेतील गती पाहता सुतार यांनी अनिल यांना शिल्पकलेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. दिल्लीतच पदवी शिक्षण पूर्ण करून अनिल यांनी अमेरिकेतून शिल्पकलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाटण्यात महात्मा गांधीचा पुर्णाकृती पुतळा आणि कोलकाता येथील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात अनिल यांनी वडीलांसोबत सहायक शिल्पकाराची भूमिका बजावली आहे.