जळगाव, 8 ऑक्टोबर : जळगावातील एल.के. फार्मवर पोलिसांनी छापा टाकत बनावट कॉल सेंटर प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 11 वर गेली असून यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना दिली.
जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले? –
एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, जळगाव पोलिसांना 28 सप्टेंबर रविवार रोजी जळगावातील मुमराबाद रस्त्यावर बनावट कॉल सेंटर सुरू असून या बनावट कॉल सेंटरवरून अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांना लक्ष्य करून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात होती अशी माहिती प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकत 31 लॅपटॉप जप्त करत ललित कोल्हे यांच्यासह सात आरोपींना अटक केली होती.
View this post on Instagram
ललित कोल्हे न्यायालयीन कोठडीत –
अटक केल्यानंतर सदरच्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरूवातील पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर बनावट कॉल सेंटर प्रकरणाच्या तपासादरम्यान अजून तीन मुख्य आरोपी सुत्राधार असल्याची माहिती समोर आली. यापैकी एकास मुंबईतून अटक करण्यात आली असून असे इम्रान खान असे त्याचे नाव आहे. दरम्यान, ललित कोल्हे 9 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचेही डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
तीन मुख्य सूत्राधार आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस –
तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तिघे अद्याप फरार आहेत. ते विदेशात पळून जाऊ नयेत यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ‘लूक आउट नोटीस’ जारी केली असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिली आहे.
राजकीय हस्तक्षेपाचा आरोप फेटाळला –
याप्रकरणातील आरोपी ललित कोल्हेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर दुसरीकडे बनावट कॉल सेंटर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचाही आरोप पोलिसांवर करण्यात आला. मात्र, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.