जळगाव, 29 जून: राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यालयामार्फत दि. २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये प्रवेशित तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षांअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणांची तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे.
तसेच सीईटी ( नीट, गेट) आदी परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच डिप्लोमा व डी-फार्मसी तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार असून अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित महाविद्यालयांच्या समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.
सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी केंद्रांच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार असून प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा जात पडताळणी कार्यालय स्तरावर दि. ३० जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत त्रुटीपूर्तता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी तसेच सीईटीसह विविध पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे.






