जळगाव, 21 सप्टेंबर: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील कौशल्यांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभागातर्फे Open Links Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेलिंग बी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळा स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध टप्प्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच विनोबा टीमच्या माध्यमातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
‘स्पेलिंग बी’ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपदा, शब्दांचे अचूक उच्चार, स्पेलिंगची अचूकता, आत्मविश्वास आणि भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा वापर आत्मविश्वासाने करता यावा, तसेच स्पर्धात्मक वातावरणातून त्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
शिक्षकांसाठी लोगो निर्मिती स्पर्धा –
स्पेलिंग बी स्पर्धेच्या आयोजनापूर्वी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांसाठी ‘स्पेलिंग बी’ या विषयावर लोगो निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केंद्र शाळा धानोरा येथील शिक्षिका मंगला पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला. जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा, टाकळी, ता. मुक्ताईनगर येथील शिक्षिका रीना भास्कर यांनी द्वितीय, तर जि.प. मराठी शाळा, वराड, ता. जळगाव येथील शिक्षिका पोर्णिमा फेगडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
शाळा स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत स्पर्धेचा प्रवास –
या उपक्रमाची सुरुवात 25 ऑगस्ट 2026 रोजी शाळा स्तरावर करण्यात आली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी केंद्र स्तरावर आणि 11 सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर स्पेलिंग बी स्पर्धा घेण्यात आली. या विविध टप्प्यांतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता 23 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा हॉटेल कमल पॅराडाईज येथे होणार असून, या स्पर्धेत चार गटांतील एकूण 120 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातून चार विद्यार्थी जिल्हास्तरीय विजेते म्हणून निवडले जाणार आहेत.
या उपक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षक, गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना शिकण्याची, व्यक्त होण्याची आणि स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारा ‘स्पेलिंग बी’ हा उपक्रम विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्तावृद्धीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.
“शब्दांच्या अचूकतेतून आत्मविश्वासाची निर्मिती आणि आत्मविश्वासातून उज्ज्वल भविष्याची वाटचाल” या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला निश्चितच नवी दिशा मिळत आहे.






