संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 22 फेब्रुवारी : धुळे जिल्ह्यातील मेहेर व लखमापुर येथील काही धनगर ठेलारी बांधव त्यांचा उदर्निवाह करण्यासाठी मेंढ्याचा कळप घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतात. पारोळा तालुक्यातील कंकराज येथून त्यांच्या कळपातील 15 मेंढ्या चोरीस गेल्याची घटना घडली. दरम्यान, भोकरबरी शिवारात त्यांच्या मेंढ्या मिळून आल्या आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी?
पारोळा तालुक्यातील कंकराज येथे मेहेरगाव व लखमापुर येथील ठेलारी त्यांचा मेढ्यांचा कळप (वाडा) आला असता त्यांच्या कळपातील 15 मेंढया चोरीस गेल्या होत्या. या मेंढ्यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, संबंधितांनी पारोळा येथील धनगर समाज युवा मल्हार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष गौ रक्षक समाधान धनगर यांची भेट घेतली.
समाधान धनगर यांनी पारोळा शहरात व परिसरात शोध घेतला असता चोरीला गेलेल्या मेंढ्या मिळून आल्या नाहीत. दरम्यान, समाधान धनगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेलारी समाज बांधव यांना सोबत घेत पारोळा पोलिस स्टेशन गाठले. पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सर्व हकीकत कळवली.
यानंतर धनगर समाज युवा मल्हार सेनेचे कार्यकर्त्यांनी काही गावात शोध घेत असताना गावातील एका व्यक्तिने समाधान धनगर यांना माहिती देत सांगितले की, भोकरबरी शिवारातील आमच्या शेतात 15 मेंढ्या आढळुन आल्या. दरम्यान, मेंढ्यांच्या शोध लावून मालकांच्या हवाली करण्यासाठी गौ रक्षक समाधान धनगर, राजु गढरी, अनिल पाटील, अमोल पाटील, भैय्या शिंदे, विनय धनगर, चेतन महाजन व ठेलारी बाधव यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : बारावीच्या परीक्षेत बहिणेला कॉपी पुरविण्यासाठी बनला तोतया पोलिस अन्……