स्वामी विवेकानंद हे कोट्यावधी भारतीयांची प्रेरणा आहेत. स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार आणि कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. दरवर्षी स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा तत्कालीन भारत सरकारने 1984 मध्ये केली होती. आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात, त्याच्या जीवन प्रवासाबाबत.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला होता. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. तर स्वामी विवेकानंदांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. पण ज्या नावाने त्यांनी देश-विदेशात ओळख निर्माण केली, ते नाव त्यांना नंतर मिळाले आणि ते नाव म्हणजे स्वामी विवकेनंद. नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा प्रवास अतिशय अनोखा आहे.
1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धार्मिक परिषदेत त्यांनी भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले तेव्हा त्यांच्या विचारांनी संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित झाले. स्वामी विवेकानंदांनी ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या संबोधनाने भाषणाला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण दोन मिनिटे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवसापासून भारतीय संस्कृतीला जगभर ओळख मिळाली. स्वामीजींचे हे भाषण आजही सर्वांच्या आठवणीत आहे. एवढेच नाही तर भारताच्या इतिहासात ही एक अभिमानाची आणि सन्मानाची घटना म्हणून ओळखली जाते.
स्वामी विवेकानंद यांनी धर्म, इतिहास, तत्वज्ञान, कला, सामाजिक विज्ञान आणि साहित्याचा प्रचंड अभ्यास केला. यामुळे त्यांना या विषयांचे जाणकार म्हटले जाते. शिक्षणासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते आणि ते उत्तम वादकही होते. स्वामीजींचे अमूल्य विचार आणि कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद हे देशातील महान आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. अध्यात्मिक शिक्षक असण्यासोबतच ते कुशल वक्ते आणि देशभक्तही होते. त्यांनी भारतीय वेद आणि पुराणांना संपूर्ण जगात ओळख दिली. तर स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी झाला.
स्वामीजींचा प्रेरणादायी विचार –
स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 रोजी कलकत्ता येथे रामकृष्ण मिशन आणि 9 डिसेंबर 1898 रोजी गंगा नदीच्या काठावर बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली. ‘उठा आणि जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका’ असे स्वामीजी म्हणायचे. त्यांचा असा विश्वास होता की जितका मोठा संघर्ष तितका विजय अधिक वैभवशाली आहे. तुला जे वाटतं तेच तू बनशील. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही कमजोर व्हाल. जर तुम्ही स्वतःला बलवान समजत असाल तर तुम्ही बलवान व्हाल.’, हे त्यांचे प्रेरणादायी विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात.