मुंबई, 29 जून: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे विविध राज्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना भिवंडी न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके –
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मूळ प्रश्नपत्रिका आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवली आहे. प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारामागे आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचा संशय असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके विविध राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत.
पेपर फुटीचे आंतरराज्यीय कनेक्शन? –
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या रॅकेटचे धागेदोरे बिहारसह इतर काही राज्यांशी जोडले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित संशयितांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि प्रश्नपत्रिका वितरणाची पद्धत याचाही तपास केला जात आहे. काही आरोपींकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन –
पेपरफुटीची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही सरकारने दिला आहे.
दरम्यान, नव्याने परीक्षा कधी घेण्यात येणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो TET उमेदवारांचे लक्ष आता तपासाच्या प्रगतीकडे आणि नव्या परीक्षा वेळापत्रकाच्या घोषणेकडे लागले आहे.
हेही वाचा: राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?






