चोपडा, 13 सप्टेंबर : महसूल विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असून विविध योजनांची व जनहिताची कामे चोपडा तहसील कार्यालयामार्फत झटपट करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रमांचा माहिती प्रसारमाध्यमांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जोमाने करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सेवा पंधरवाड्यात विविध सेवा देण्यात येणार –
महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार चोपडा तालुक्यात सेवा पंधरवाडा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन केलेले असून चोपडा तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम, जिवंत सातबारा, जिवंत रेशन कार्ड, शेत सुलभ योजना, पानंद रस्ते, दफनभूमी /स्मशानभूमी, छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर, शेतकरी आत्महत्या कुटुंबाला लाभ देणे, महाविद्यालयीन शिबिरे मधून विद्यार्थीना कागदपत्रे आवश्यक प्रमाणपत्र वाटप, 2 ते वर्ग 1 रूपांतरण, सामाजिक अर्थसहाय्य योजना, दिव्यांगांना रेशन कार्ड, स्मशान भूमीलगतचे अतिक्रमण काढणे , गरज पडल्यास वॉल कंपाऊंडसाठी प्रस्ताव पाठवणे आदी सेवा या पंधरवड्यात जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य महसूल विभागामार्फत जोमाने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : जळगावात ‘धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी कार्यशाळा संपन्न