छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल : महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावेळी शिंदेंनी शिवसेनेतून बंड करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी आता ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचंय, असा दावा शिंदेंच्या शिवसेना पक्षातील मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. मात्र, भाजपकडून त्यांना आता पक्षप्रवेशावर बंदी असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितलंय.
संजय शिरसाट काय म्हणाले? –
मंत्री संजय शिरसाट माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आम्ही ज्या दिवसापासून उठाव केला तेव्हापासून त्यांना भाजपसोबत जायचंय. एकनाथ शिंदेंना रोखायचं, यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. परंतु, शिंदे साहेबांनी केलेली हिंमत ही मोदी साहेबांना देखील माहितीये. मग कोणाच्या नातेवाईकांसोबत भेटणे..कोणासोबत हात मिळवणी करणे..हे आम्हाला सर्व माहितीये.
दरम्यान, हे सर्व प्रयत्न करून ते थकले असून त्यांना वरिष्ठांकडून स्पष्ठ सांगण्यात आलंय की, आमच्याकडे यायला तुम्हाला आता प्रवेश बंदी असून त्यांना भाजपने प्रवेश नाकारलाय. असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.
आम्हाला भाजपबरोबर सत्तेत जायचं नाही – संजय राऊत
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, आम्हाला भाजपबरोबर सत्तेत जायचं नाही. ईव्हीएम हॅक करून तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून त्यांनी निवडणुका जिंकल्या. त्यांच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.