चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 24 जून : आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. भाजपला जरी या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असे यश मिळाले नसले तरी मित्रपक्षांना सोबत घेऊन देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आले.
आजपासून संसदीय अधिवेशनाला सुरुवात –
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून आज पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होईल. यानंतर खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी हे कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील.
महाराष्ट्रातले पाच मंत्री आणि 14 खासदार आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शपथ घेणार असून सकाळी 11 ते 1 वाजेच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच मंगळवारी उरलेल्या 29 खासदारांचा शपथविधी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे.
विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता –
देशात गेल्या काही दिवसांपासून नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यावरून विरोधक सरकारची कोंडी करू शकतात. नीट परिक्षेची प्रक्रिया तसेच नेट परिक्षेचे रद्द होणे, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार इत्यादी मुद्द्यांवरून विरोधक एनडीए सरकारला जोरदार धारेवर धरण्याची शक्यता आहे. यावेळी इंडिया आघाडीतील खासदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यानी विरोधक सरकारचा जोरदार विरोध करतील.