मुंबई, 29 मे: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सून हंगामाबाबत (जून ते सप्टेंबर २०२६) आपला दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या नियमांनुसार हे प्रमाण ‘सामान्यपेक्षा कमी’ मानले जाते.
तसेच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 43 टक्क्यांपर्यत कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, प्रशांत महासागरामध्ये सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’ या हवामान प्रणालीमुळे यंदाचा मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र आणि मध्य भारताला मोठा फटका बसणार –
भारतीय हवामान विभागाच्या या सुधारित अंदाजाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. भौगोलिक रचनेनुसार महाराष्ट्र हा प्रामुख्याने ‘मध्य भारत’ आणि ‘दक्षिण द्वीपकल्प’ या दोन्ही विभागांमध्ये मोडतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विभागांमध्ये यंदा पाऊस सामान्यपेक्षा खूप कमी असेल. आकडेवारीनुसार, मध्य भारतात पाऊस कमी पडण्याची संभाव्यता ४३ टक्के, तर दक्षिण द्वीपकल्पात ४५ टक्के एवढी जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांवर दुष्काळाचे संकट घोंगावण्याची भीती निर्माण झाली आहे.
जून महिन्याची सुरुवात कडक उन्हाने होणार –
मान्सूनच्या सुरुवातीचा महिना म्हणजेच जूनमध्ये देखील देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडेल. जूनमध्ये पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता असून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) अधिक तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ ईशान्य भारतात (North-East) पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्राची चिंता वाढली –
भारताची अर्थव्यवस्था आणि शेती प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. आधीच महाराष्ट्रातील अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना, आता कमी पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. पेरण्या खोळंबण्याची आणि खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






