पुणे : काल सर्वत्र धुलिवंदन साजरा होत असताना एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला वाचवण्याकरिता गेलेल्या तिघांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. धुळवड साजरी करण्यासाठी नदीवर गेलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण घटना –
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील देहूरोड किन्हईजवळ इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. राज दिलीप अघमे (वय 25, रा. घरकुल, चिखली), आकाश विठ्ठल गोरडे (वय 24, रा. घरकुल, चिखली) आणि गौतम कांबळे (वय 24, लोकमान्य हॉस्पिटल) अशी मृतांची नावे आहेत.
इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात जलउपसा केंद्राजवळ 6 तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यापैकी एक तरुण बुडायला लागला हे पाहून त्याला वाचवायला त्याचे मित्र गेले. यावेळी बुडणारा तरुण वाचला. मात्र, त्याचे तीन मित्र पाण्यात बुडाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ, एनडीआरएफ, पीएमआरडीए, अग्निशमन दल यांची बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली होती.
यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने इंद्रायणी नदीपात्रात शोधकार्य राबवले आणि तिघांना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी याठिकाणी नेण्यात आले असता तिथे तपास करुन सदर डॉक्टरांनी पावणे सात वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, तिघांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.