बीड, 19 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना बीड जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरूणांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. बीड-परळी महामार्गावर पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना आज सकाळी 19 जानेवारी रोजी भरधाव एसटी बसने चिरडले. दरम्यान, या अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. लाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे असून या अपघाताच्या घटनेने गावकरीही हळहळले आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, बीड परळी महामार्गावर आज रविवारी पहाटेच्या सुमारास महामंडळाच्या एसटी बसने तीन तरुणांना उडवले. दरम्यान, पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या या तीनही तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना जोरदार धडक दिली. घोडका राजुरी जवळ झालेल्या या बस अपघातात तिघांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला.
तिघांचा जागीच मृत्यू –
परळी महामार्गावर झालेल्या या अपघातात, बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच तरुणांच्या नातेवाईकांनी अपघाताबाबतची माहिती मिळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु असून पोलिसांकडून सदर घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ –
गेल्या काही वर्षांत राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अपघातांना अनेक कारणे असली तर चालकांचे वाहनांवर नियंत्रण नसणे हे त्यातले प्रमुख कारण अपघातास जबाबदार असल्याचे अनेकदा दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या अपघाताच्या घटनांबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी होऊन नियंत्रण आणले पाहिजे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर