ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 31 ऑगस्ट : पाचोरा-भडगाव विधासभा मतदारसंघात वैशाली किरण सुर्यवंशी आणि अमोल शांताराम शिंदे असे नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी 29 ऑक्टोबर रोजी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावरून गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, वैशाली किरण सुर्यवंशी या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांनी तर अमोल शांताराम शिंदे या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांच्या प्रस्तावकाकडून हरकत घेण्यात आली होती. दरम्यान, काल 30 ऑक्टोबर रोजी यासंबंधीची सुनावणी पार पडल्यानंतर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी अमोल शांताराम शिंदे आणि वैशाली किरण सुर्यवंशी या दोघेही उमेदवारांना वैध ठरवले आहे.
सुनावणीत नेमकं काय घडलं? –
अपक्ष उमेदवार अमोल शांताराम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध –
अमोल शांताराम शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यानंतर सदर उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राची छाननी सुरु असताना अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचे प्रस्तावक अॅड. अनुराग जिवाजीराव काटकर यांच्यावतीने उमेदवाराने शपथपत्रात भरलेल्या माहितीबाबत हरकत घेण्यात आलेली होती. दरम्यान, यावर सुनावणी पार पडली असता अॅड. अनुराग जिवाजीराव काटकर यांचा अमोल शांताराम शिंदे (रा. घुसर्डी खु. ता. भडगाव) यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्र क्रं. 39 वरील हरकत अर्ज फेटाळण्यात आला. तसेच अमोल शांताराम शिंदे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र क्रं. 39 हे वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी घोषित केले.
अपक्ष उमेदवार वैशाली किरण सुर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज वैध –
वैशाली किरण सुर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यानंतर सदर उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राची छाननी सुरु असताना शिवसेना उबाठाच्या उमेदवार वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यावतीने उमेदवाराने शपथपत्रात भरलेल्या माहितीबाबत हरकत घेण्यात आलेली होती. दरम्यान, यावर सुनावणी पार पडली असता वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांचा वैशाली किरण सुर्यवंशी (रा. नांद्रा, ता. पाचोरा) यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्र क्रं. 32 वरील हरकत अर्ज फेटाळण्यात येत आले. तसेच वैशाली किरण सुर्यवंशी (रा. नांद्रा, ता. पाचोरा) पाचोरा यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र क्रं. 32 हे वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी घोषित केले.
आता लक्ष उमेदवारांच्या माघारीकडे –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यानंतर झालेल्या छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर एकूण 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर सुरेश पांडुरंग पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. दरम्यान, आता एकूण 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचोऱ्यांत राजकीय वातावरण तापले असताना येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत कोण-कोण उमेदवारी अर्ज माघार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा : Video : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, थेट जनतेशी संवाद…