चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 21 जुलै : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून भाजपने रणनिती आखायला सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग म्हणून पुण्यातील बालेवाडी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन घेण्यात आले. दरम्यान, या अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करत गृहमंत्री शहा यांनी जोरदार भाषण केले.
काय म्हणाले अमित शहा? –
पुण्यातील अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत. आम्ही 2014 साली आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? मात्र, आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले.
“….तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते” –
आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची (विरोधकांची) सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते. शरद पवारांची सत्ता आल्यानंतर ते आरक्षण जाते, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पुढचे 30 वर्ष भाजपचे सरकार –
लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठे यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, आता फक्त 10 वर्षे पुर्ण झाली आहेत आणि पुढचे 30 वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल. आपल्यातील आत्मविश्वासाला जागरूक करण्याची गरज असून आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपचं करू शकते आणि याच आत्मविश्वासासह पुढे जायचे आहे, असा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित –
पुण्यात आयोजित केलेल्या या अधिवेशनाची ‘संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती’ ही टॅगलाईन आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले संघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे, असल्याचे अधिवेशनातून स्पष्ट होत आहे. अधिवेशनाला शहा यांच्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्यातले प्रमुख नेते उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीची दिशा आणि रणनिती यावर अधिवेशनात शहा यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, अधिवेशनाला राज्यातून पाच हजारहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले.
हेही पाहा : Special Interview : ‘त्या’ शाळांना आरटीईची प्रक्रिया राबवावीच लागेल – अॅड. दीपक चटप यांची विशेष मुलाखत