जळगाव, 9 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात जाहीर सभा पार पडत आहेत. अशातच ते उद्या जळगाव जिल्ह्यात येत असून फैजपूर येथे त्यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे रावेर मतदारसंघाचे भाजप उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या फैजपुरात येत असल्याने उद्या सकाळी 9 पासून संध्याकाळी 4 पर्यंत फैजपूर येथे ‘ नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
अमित शहा यांचा उद्याचा दौरा –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे उद्या महाराष्ट्रात येत आहेत. उद्या सकाळी त्यांची मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुंबई येथील बांद्रामधील सॉफिटेल होटेल येथे संकल्प पत्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यातील फैजपुर येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमधील मैदानावर दुपारी 12 वाजता प्रचारसभा पार पडणार आहे. तसेच दुपारी 2 वाजता मलकापुर तर सांयकाळी 3.30 वाजता वरुड (अमरावती) येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभा होणार आहेत.
फैजपरात प्रचारसभेचे आयोजन –
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी फैजपूर येथील जी.टी महाजन इंग्लिश स्कूल मैदान परिसरात उद्या 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अमित शहा यांची सभा पार पडणार आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघ –
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी करत आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. विधानसभेसाठी अमोल जावळेंना भाजपच्या पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते त्यांचे सुपूत्र धनंजय चौधरी हे रिंगणात आहेत. तर दुसरीकडे वंचितकडून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.