नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महारांचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठ विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले? –
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समुद्र किनाऱ्याच्या तीन किलोमीटर अंतरात असलेली बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला जावा, असा आपला नेहमीच आग्रह असतो. हे बांधकाम सुरक्षित समजले जाते तसेच शिवाय गंज लागण्याची भितीही नसते. जर मालवण इथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टिलचा असता तर तो कोसळला नसता, असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुंबईत ज्या वेळी 55 उड्डाणपूल बांधले त्यावेळचा अनुभवही गडकरींनी सांगितला.
View this post on Instagram
शरद पवार यांची प्रतिक्रिया –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. गडकरी हे केंद्र सरकारमध्ये मंत्री असून ते प्रत्येक काम बारकाईने करत असतात. तसेच त्या कामात ते स्वत:ला गुंतवून घेत असतात. त्यांनी आता पुतळ्याबाबत वक्तव्य केलंय. त्या आधी त्यांनी तज्ज्ञांबरोबर चर्चा केली असेल आणि त्यानंतरच ते वक्तव्य केले असेल, असे शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, महाराजांचा पुतळा कोसळला त्याला सरकार जबाबदार असल्याचेही पवार म्हणाले.
नेमकी घटना काय? –
सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होते. दरम्यान, एका वर्षाच्या आतच हा पुतळा कोसळल्याने सरकारवर जोरदार टीका सुरू झाली. यानंतर पुतळ्याचे शिल्पकार आणि कन्सल्टंट या दोघांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट उसळली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची आज एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक, संपाची आताची अपडेट नेमकी काय?