मुंबई, 4 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिल्यानुसार कालपासून हा संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संपामुळे एसटीची चाके थांबली –
राज्यात लालपरी अर्थात एसटी महामंडळाची बस ही परिवहनाची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे एसटीची चाके थांबली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची काल 50 टक्के सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आज देखील या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघणार का? –
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप मागे घ्यावा व त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली आहे. आज सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार असून मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का?, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावीतने कामगार संघटनांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली असता, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता, तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. सरकारने संप मिटवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देशही औद्योगिक न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांची बंदची हाक, जळगावसह जिल्ह्यातील बस आगारांची नेमकी काय परिस्थिती?