ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : शेतकऱ्यासाठी त्याची शेती आणि शेतातील पीक हेच त्याचे आयुष्य असतं. मात्र, हेच पीक जर कुणी नष्ट करुन टाकण्याचा प्रयत्न केला तर?, मात्र, दुर्दैवाने अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे. सुमारे 7 एकर कापूस लागवड केलेल्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारले. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
पाचोरा तालुक्यातील शेवाळे शिवारामधील शेतकरी सुनील संपत पाटील, सुभद्रा संपत पाटील, संदीप संपत पाटील यांच्या कुटुंबाची सात एकर शेती आहे. या शेतात त्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. या शेतात ओलिताची सोय असल्याने त्यांनी 31 मे रोजी कापूस पिकाची लागवड केली.
आज त्यांच्या शेतातील कापूस पीक दोन महिन्यांचे झाले असून पीक जोमदार असून कापसाची वाढ दोन ते अडीच फुटापर्यंत झाली आहे. मात्र, पीक परिस्थिती चांगली असताना अचानक होत्याचे नव्हते झाले. याठिकाणी सुमारे सात एकर कापूस शेतीवर अज्ञात व्यक्तीने 9 जुलै बुधवारी रोजी रात्रीच्या सुमारास तणनाशक फवारल्याने कापसाचे पीक जळून गेले. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी संपूर्ण सात एकरमध्ये तणनाशक फवारून कापूस पिकातील ठिबक सिंचनाच्या नळ्यादेखील कापण्यात आल्या आहेत. त्याचेदेखील मोठे नुकसान अज्ञात व्यक्तीने केले आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित व्यक्तीचे नावाने तक्रार अर्ज दाखल केला आहे.
जीवितहानीची व्यक्त केली भीती –
दरम्यान, याबाबत तक्रारदार शेतकरी यांनी सांगितले की, माझ्या शेतात व्यक्तीच्या पाऊल खुणा असून कापूस पिकावर तणनाशक मारून ठिबक सिंचनाचेही मोठे नुकसान केले आहे. माझ्या शेतातील विहिरीवर परिसरातील अनेक शेतकरी पाणी प्यायला येतात. तसेच आम्हीसुद्धा याच विहिरीचे पाणी पितो. त्यामुळे भविष्यात या विहिरीमध्ये जर विषारी औषधी टाकली तर आमच्यासह परिसरातील विहिरीवर पाणी घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवालाही धोका आहे, अशी भिती त्यांनी व्यक्त करत पोलीस प्रशासनाने माझ्या शेतावरील घटनेचा त्वरित तपास करून मला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.