जळगाव, 11 जुलै : जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये. न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा, अन्यथा महाविकास आघाडी लोकांपर्यंत पोहचून आंदोलनाचा मार्ग स्विकारेल, असे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन मंत्री हे काम बिघाडा असल्याची टीका यावेळी उन्मेश पाटील यांनी केली.
उन्मेश पाटील काय म्हणाले? –
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने काल जळगावात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्यांना कोणीच वाली राहिलेले नाहीये. त्यांचात जर हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. मात्र, यांच्यात एकातही हिंमत नाहीये. यांचा एकाचाही अभ्यास नाहीये. यांना एकाही प्रश्नाची जाण नाही, अशी टीकाही माजी खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केली.
भाजपवर टीका –
मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसायची. ओबीसीची मागण्या मान्य न करता त्यांच्या भावनांसोबत खेळायचे. आदिवासी समाजामध्ये भांडणे लावायचे. धनगर समाजाला एसटी समकक्ष करतो, असे आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करायची नाही. यापद्धतीने कामे करून केवळ याठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजता येईल का, असे हे सत्ताधारी बघत आहेत. यामुळे भाजपचा चेहरा उघड झाला असल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली.
तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार –
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जळगावातून क्रांतीला सुरूवात झाली असून जोपर्यंत शाश्वत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार. तसेच टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीकडून ही आंदोलन करण्यात येणार असेही पाटील यांनी सांगितले.