जळगाव, 17 मे : एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराई सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती कामांना वेग आला आहे. अशातच पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलीय. तर काही ठिकाणी केळी बागांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी –
पाचोरा, भडगाव, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव, यावल, पारोळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तासांहून अधिक वेळ चालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात केळी, मका, ज्वारी तसेच बाजरी पिकांचे नुकसान झाले. तसेच पावसाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची जनावऱ्यांची चाऱ्यासाठी धावपळ सुरू असताना अनेक ठिकाणी चाऱ्याचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. असे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश