चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चोपडा (जळगाव), 31 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील वैभवी ठाकरे या तरुणीची राज्यसेवेतून सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे. उद्या 1 सप्टेंबरपासून त्या धुळे येथे परिविक्षाधीन सहायक गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्विकारणार आहेत.
विशेष म्हणजे मागच्या वर्षी त्यांची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधून राज्यकर निरीक्षक (STI) या पदी OBC महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 मधून मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी (Assistant section Officer -ASO) आणि राज्य कर निरीक्षक (STI) या दोन्ही पदी म्हणजे एकूण तीन पदांसाठी निवड झाली होती. यामध्ये त्यांनी मुंबई येथे राज्य कर निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला होता. यानंतर आता त्यांची राज्यसेवेतून सहाय्यक गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे.
वैभवी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी –
वैभवी ठाकरे या चोपडा शहरातील रहिवासी आहे. वैभवी यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी हे सानेगुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे झाले. त्यानंतर सहावी ते दहावीचे शिक्षण हे विवेकानंद विद्यालय चोपडा येथे पूर्ण झाले. 2009 मध्ये वैभवी यांनी दहावीला 92.76 टक्के गुण मिळवत तालुक्यात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला होता. यानंतर 2011 मध्ये बारावीचे शिक्षण हे चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज, येथून 86 टक्के मिळवत पूर्ण केले. तर 2015 मध्ये नाशिक येथील के. के. वाघ कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. तर आई गृहिणी आहेत. त्यांची लहान बहिण ही शिक्षिका तर लहान भाऊ हा बी. फार्मसीचे शिक्षण झाल्यानंतर इंदूर येथील कंपनीत कार्यरत आहेत.
स्पर्धा परिक्षेच्या प्रवासाला सुरुवात –
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना वैभवी यांनी सांगितले की, शासकीय अधिकारी व्हायचे हे त्यांनी शालेय जीवनापासूनच ठरवले होते. त्यामुळे पदवीच्या शिक्षणानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2015 मध्ये त्या पुण्याला गेल्या. 2015 ते 2016 या कालावधीमध्ये त्यांनी पुण्यातील द युनिक अॅकॅडमी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र, यानंतर सुरुवातीची दोन-तीन वर्ष त्यांना यूपीएससीच्या परिक्षेत अपयश आले. त्यामुळे मग त्यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
2019 पासून त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. पण यानंतरही 2019 आणि 2020 मध्ये सलग दोन वेळा पूर्व परीक्षेतच अपयश आलं. यामुळे मग त्यांनी यानंतर एमपीएससी राज्यसेवेसोबत कम्बाइन परीक्षेचीही तयारी सुरू केली. यानंतर 2021 पासून सलग मुख्य परीक्षांपर्यतही त्यांनी मजल मारली. 2022 च्या परीक्षेमध्ये ती मुलाखतीपर्यंतही पोहोचली. पण त्यांना 12 मार्क कमी मिळाल्याने राज्यसेवेच्या अंतिम यादीत त्यांची निवड होऊ शकली नाही.
मात्र, यानंतर 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षांच्या एमपीएससी संयुक्त परीक्षेत त्यांनी बाजी मारली आणि राज्य कर निरीक्षक पदी तिची निवड झाली. विशेष म्हणजे या मध्ये 2022 च्या परीक्षेत त्या ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात पहिली आल्या. डिसेंबर 2023 मध्ये या परीक्षेचा निकाल आला. यामध्ये त्या राज्य कर निरीक्षक झाली. त्यासोबत मागच्याच महिन्यात लागलेल्या निकालात तिची पुन्हा राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आणि आता एप्रिल 2024 मध्ये लागलेल्या निकालात सहायक कक्ष अधिकारी म्हणूनही त्यांची निवड झाली.
यानंतर त्यांनी राज्य कर निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला होता. दरम्यान, आता त्यांची राज्यसेवेतून सहाय्यक गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे. उद्या 1 सप्टेंबर रोजी त्या धुळे येथे परिविक्षाधीन सहायक गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्विकारतील. आपल्या पदाला 100 टक्के न्याय देण्यासाठी कार्यरत राहील, असे त्यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.
आपल्या या प्रवासात आई वडिलांची भूमिका फार महत्त्वाची राहिली असे सांगत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील वरिष्ठांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. तसेच एकाग्रतासुद्धा महत्त्वाची आहे. आयोगाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका हेच तुमच्याशी एकप्रकारे संवाद साधत असतात. त्यामुळे यांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे, असा महत्त्वाचा सल्ला दिला.
तसेच आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. मुलांनीही आपल्या आईवडिलांचा विश्वास संपन्न केला पाहिजे. या प्रवासात अपयश येऊ शकतं, ती वेळही सांभाळता येणं ही महत्त्वाची आहे. यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, असा पालकांनाही सल्ला दिला.