मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार होते. यादरम्यान, आज वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळाली. त्यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
त्यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे होते. फाळणीनंतर मनोज कुमार 10 वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झालं.
मनोज कुमार यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. तसेच या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती. दरम्यान, आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्री मोदींनी वाहिली श्रद्धांजली –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, ‘दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आयकॉन होते, जे त्यांच्या देशभक्तीच्या आवेशासाठी विशेषतः लक्षात ठेवले गेले, जे त्यांच्या चित्रपटांमध्ये देखील दिसून आले. मनोज जी यांच्या कार्यांनी राष्ट्राभिमानाची भावना प्रज्वलित केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह आहेत. ओम शांती.’