पणजी (गोवा), 8 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गुरुवारी (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना आज पहाटे त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सलग ४५ मिनिटे सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आले नाही. मणिपाल रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना आज पहाटे ५.२० वाजता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाची मेडिको-लीगल केस (MLC) म्हणून नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा दमदार प्रवास –
नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘पुरुष’ या नाटकातील गुलाबराव तसेच ‘हमीदाबाईची कोठी’मधील सत्तार अजरामत या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काळात मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘खामोशी’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही काम केले. त्यांच्या दमदार संवादफेकीसह परखड आणि वास्तववादी अभिनयामुळे ते हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात –
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. २०१५ मध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना करण्यात आली.
या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांना मदत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष गावपातळीवर काम करण्यासाठी नाना पाटेकर यांनी पुढाकार घेतला. अभिनयातील ठसा, सामाजिक बांधिलकी आणि परखड व्यक्तिमत्त्वामुळे नाना पाटेकर यांनी रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी आणि संवेदनशील कलाकार हरपला असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.






