अमरावती, 20 सप्टेंबर : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटताना दिसून येतोय. जळगावतील आक्रोश मोर्चात बच्चू कडूंनी गुलाबराव पाटील यांना इशारा दिला होता. यावर बोलताना मंत्री गुलाबरावांनी बच्चू कडूंना थेट पाळधीत येऊन तर दाखवावं असं आव्हान दिलं होतं. दरम्यान, आता बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान स्वीकारलं असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी मी जळगावात येत असून ते सांगतील त्याठिकाणी यायला तयार आहेत, असे कडू म्हणाले. ते अमरावतीत पत्रकारांसोबत बोलत होते.
गुलाबराव पाटील यांनी काय आव्हान दिलं होतं? –
धरणागावात एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बच्चू भाऊ म्हणतात की, गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढेन. पण त्यांनी स्वतःच यावं.तसेच त्यांनी पाळधीत येऊन तर दाखवावं, असं आव्हानच मंत्री पाटील यांनी दिलं होतं. दरम्यान, बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान स्वीकारलं आहे.
बच्चू कडूंनी स्वीकारलं मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान –
अमरावतीत पत्रकारांसोबत बोलताना माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, गुलाबराव यांचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. एवढा चांगला गुलाब सोडून कमळाच्या पाठीशी का लागेल गुलाबराव? तुम्ही एका गावाचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहात. म्हणून तुमची इच्छा पुर्ण करू. दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबरला मी जळगावात असून तुमच्या गावात…तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या आजूबाजूने राहणार आहे. तुम्ही जर म्हटलात घरी या तर घरी येऊ. पाहू काय व्यवस्था करता येईल तुमची तर अन् तुम्ही आमची काय व्यवस्था काय करतात.
View this post on Instagram
दरम्यान, गुलाबराव तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून राहा. तुम्ही जरी मंत्री असले तरी विधानसभेत तुमचा जो आवाज आम्ही पाहायलाय तो आवाज शेतकऱ्यांसाठी दबलेला दिसतोय. तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या आणि आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचं आव्हान स्वीकारायाला तयार आहोत, असेही बच्चू कडूंनी सांगितले.






