चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 22 मे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण चांगलेच तापले असून या अपघाताविरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालला आज पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं? –
पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवालची कोर्टाने 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये आज या प्रकरणातील पार पडलेल्या सुनावणीत सरकारी वकीलांनी विविध गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. दरम्यान, न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केली.
सरकारी वकिलांनी खालील प्रश्नांचा तपास करण्यासाठी मागितली पोलीस कोठडी –
- विशाल अगरवाल यांनी त्यांच्या मुलाला विना नंबर प्लेट गाडी चालवायला का दिली?
- वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली?
- मुलाचा खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला?
- गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले?
पोर्श कार अपघात प्रकरणात पुढील तपासासाठी न्यायालयाने विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना सुद्धा पुणे सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
असिम सरोदे यांच्याकडून याचिका दाखल –
पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे का दाखल केले? तसेच पबकडून दारुबांदी कायद्याची अंमलबजावणी झाली नसतानाही या प्रकरणात दारूबंदीचे एकही कलम का लावले नाही? असा सवाल कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला. दरम्यान, त्यांनी याप्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
पोर्श कार अपघात प्रकरण –
पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणातील पोर्श कारचालक हा अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, भीषण अपघात झाला असताना देखील अशा सहजतेने अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर झाल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.
यावरून कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. दरम्यान, आज पार पडलेल्या सुनावणीत त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली A to Z माहिती