जळगाव, 2 मे : दिवसेंदिवस हवामानाचे चक्र बदलत असून राज्यात उन्हाचा पार वाढत आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात उष्णतेची लाट –
राज्यात पुढील 24 तासात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात ही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जळगावचे तापमान –
जळगाव जिल्ह्यात गेले काही दिवस सुर्य आग ओकत असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यात उष्णेतेचा पारा हा 40 अंशाच्या वर गेला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्याचे हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा 42 अंश इतका राहणार आहे. उन्हाचा नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.