मुंबई : राज्यात पुन्हा महायुती सरकार विजयी झाल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये प्रति महिना देण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना दिले होते. यानंतर राज्यात महायुती सरकारचा पुन्हा ऐतिहासिक असा विजय झाला. पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
सरकार स्थापन होऊन 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार, आपल्याला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळतील, याकडे राज्यातील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. याबाबत विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका होत असताना आता शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘आता त्यासाठी आपल्याला 5 वर्षे वाट पाहावी लागेल. आताच कसं सांगणार, हा पहिला अर्थसंकल्प आहे. आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आलंय. त्याला सांगताय तु पाचवीतला पाढा कधी म्हणणार. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा म्हणतील ना,’ असे त्या म्हणाल्या.
शेतकरी कर्जमाफीवर अजित दादांचं मोफत भाष्य –
बारामतीतील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड याठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण, अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सभागृहात उत्तर देताना सांगितलं की, सगळी सोंग करता येतात. पण पैशाचं सोंग नाही करता येत. आम्ही राज्यातील 13 कोटी जनतेचा विचार करतो. आता अनेकजण म्हणत होते की, दादा मागच्या वेळी काहींनी जाहीरनाम्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. आज 28 तारीख आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 मार्चच्या आत आपल्या पीककर्जाचे पैसे भरा. परिस्थितीनुरुप आम्ही पुढचे निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षी, पुढच्या वर्षीही घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा.