मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान हे वर्षा बंगला आहे. मात्र, विधानसभा निवडणूक होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपल्या सरकारचे 100 दिवसही पूर्ण केले आहेत. मात्र, अजूनपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला केले नाहीत. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केलेली आहे. मात्र, यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून त्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार याबाबतची माहितीही दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार? या प्रश्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही जणांना तो प्रश्न उगाच पडला आहे. तर काही लोकांना खरंच पडलाय. पण मी एप्रिल महिन्यात वर्षा बंगल्यावर जाईल. 27 मार्चला माझ्या मुलीची दहावीची परिक्षा संपेल आणि त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षा बंगल्यावर शिफ्ट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊतांनी साधला होता जोरदार निशाणा –
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत, या शब्दात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता.
दरम्यान, आता तीन महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहेत. 27 मार्चला माझ्या मुलीची दहावीची परिक्षा संपेल आणि त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षा बंगल्यावर शिफ्ट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.